ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 13 - राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना पक्षात प्रवेश दिला आहे. ते चारही बाजूंनी गुंडांना सोबत घेऊन चालतात ते गुंडाचे कॅप्टन आहेत असा आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी आज औरंगाबादेत केला. मुख्यमंत्री सध्या शोले सिनेमातील गब्बरच्या भूमिकेत असल्याचा चिमटा त्यांनी यावेळी काढला. पालकमंत्री कदम म्हणाले, शिवसेनेची औकात दाखविण्याचा कुणातही दम नाही पण मुंबई मनपाची निवडणुक होऊ द्या, शिवसेनेन टेकू काढल्यावर भाजपची औकात दिसेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या तोंडाला फेस आणला असून भाजप नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहणार नसल्याचे भाकीत त्यांनी केले. ज्यांनी शिवसेनेचे बोट धरून आपल्या पक्षाची व्याप्ती वाढविली तेच शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. भाजपा हा पक्ष कपटी असून अशा मित्रा पेक्षा दुश्मन बरा आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना केवळ शिवसेनेने त्यांच्या कुटुंबाला सर्व प्रकारची मदत केली. दुष्काळात भाजप व इतर पक्षाचे नेते कुठे होते असा सवाल त्यांनी केला. फुलंब्री तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणातील उमेदवाराच्या प्रचारार्थ कदम यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. सभेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर मोदी पंतप्रधान नसतेगुजरातमधील गोधरा हत्याकांडांनंतर नरेंद्र मोदी यांना भाजपातून हाकलण्याचा निर्णय झाला होता. पण त्याला बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती. बाळासाहेबांनी मदत केली नसती तर आज पंतप्रधान म्हणून मोदी आपल्या दिसले नसते. असा गौफ्यस्फोट पालकमंत्री कदम यांनी केला. मोदीच आज महाराष्ट्रातून शिवसेना संपविण्याचा डाव आखत आहेत. त्या विषयी मला खुद्द माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नोट बंदीमुळे किती काळा पैसा आला याची माहिती पंतप्रधान मोदी देत नाहीत. त्यांनी शेतकरी वर्ग संपविल्याचा आरोप कदम यांनी केला.
मुख्यमंत्री हे गुंडांचे कॅप्टन - रामदास कदम
By admin | Updated: February 13, 2017 18:01 IST