मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक हे वर्षानुवर्षे या विभागाचे सर्वेसर्वा होते. मात्र, शासनाने आता या विभागासाठी आयुक्तांचे पद निर्माण केले असून, विभागाचे प्रमुख म्हणून सगळी जबाबदारी आता आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. नव्या निर्णयामुळे अर्थसंकल्प-तपशिल, प्रशिक्षण-प्रचार, खरेदी, तसेच ‘मन्थली इर्न्फमेशन सीस्टिम’ हे चार प्रमुख विभाग सांभाळणारे, यापुढे थेट आयुक्तांना रिपोर्ट करतील. त्यांच्यावरचा संचालकांचा अंकुश हटविण्यात आला आहे. एनआरएचएमचे प्रदीप व्यास आता राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेसर्वा असतील.या पुढे संचालकांकडे सामाजिक बांधिलकी असलेले आणि आरोग्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम हे दोनच विभाग ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता आणखी एक संचालक पद तयार केले जाणार असून, त्या पदासाठीदेखील प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या २९७ कोटींच्या औषध खरेदीतील घोटाळ्याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केला होता. त्यानंतर, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले होते. हे एवढे होऊनही सरकारने कोणतीही तांत्रिक चौकशी न करताच निलंबित केलेल्या संचालक डॉ. सतीश पवार यांना पुन्हा कामावर रूजू करण्याचे आदेश काढले. पवार यांच्यासह अन्य चार जणांची याच खरेदी प्रकरणात एसीबीने खुली चौकशी सुरू केलेली असताना, अशांना पुन्हा त्याच ठिकाणी नेमता येते का? असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, मुख्यमंत्री कार्यालय एकदम सक्रीय झाले आणि अचानक सूत्रे हलली. कालच्याच तारखेने काढण्यात आलेल्या नव्या रचनेनुसार, आयुक्त कुटुंब कल्याण तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान हे पद यापुढे आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई असे केले जाणार आहे. आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत सर्व प्रकारच्या आरोग्य सेवेशी संबंधित तांत्रिक विषय संचालक आरोग्य सेवा यांच्यामार्फत नव्या आयुक्तांकडे सादर केले जातील. इतर सर्व अतांत्रिक विषय आयुक्त आरोग्य सेवा यांच्याकडे संबंधित सहसंचालकांच्या मार्फत थेट सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे संचालक, आरोग्य सेवा या नावाने ओळखला जाणारा राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग या पुढे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या नावाने घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा प्रशासकीय दृष्टीने आयुक्तांच्या नियंत्रणाखाली येतील. हे निर्णय १८ आॅक्टोबरपासून अंमलात आणण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)>नवी घोषणाया पुढे संचालक, आरोग्य सेवा या नावाने ओळखला जाणारा राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग यापुढे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या नावाने घोषित करण्यात आला आहे.
आरोग्य विभागात आयुक्तच सर्वेसर्वा
By admin | Updated: October 20, 2016 05:20 IST