मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फरार आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. मोहम्मदअली आमदारे (४०) असे या आरोपीचे नाव असून, तो कुख्यात छोटा राजन टोळीचा गँगस्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.१९९५मध्ये शिवडी परिसरातील तरुणाच्या हत्येप्रकरणात आमदारेला रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. २००६मध्ये तोे २० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला. मात्र पॅरोल संपल्यानंतरही तो पुन्हा कारागृहात न परतल्याने त्याला फरार घोषित केले होते. या काळात त्याने खंडणीचे अनेक गुन्हे केले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अंधेरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांनी एका पथकाद्वारे आमदारेचा शोध सुरू केला. या पथकाला आमदारे मुलुंडच्या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून आमदारेला गजाआड केले. (प्रतिनिधी)
छोटा राजन टोळीतील फरार आरोपी अटकेत
By admin | Updated: July 16, 2014 01:29 IST