ए. आर. खानल्ल अहेरी (जि़ गडचिरोली)गडचिरोली या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्णात शासकीय सेवेचे वैद्यकीय अधिकारी येऊन सेवा बजावत नसल्याने छत्तीसगडमधील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा वैद्यकीय व्यवसाय जिल्ह्णाच्या सीमावर्ती भागात फोफावत चालला आहे. याबाबत राज्य शासनाची आरोग्यसेवा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते़ एकप्रकारे दुर्गम व अतिदुर्गम भागातील रूग्णांच्या जीवाशी खेळच सुरू असल्याचे चित्र आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, सिरोंचा या तालुक्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत़ या भागात शासनाच्या आरोग्य सेवेशिवाय पर्यायी आरोग्य सेवा नाही. शासनाच्या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तर काही दुर्गम गावातील लोक आरोग्य केंद्रापर्यंत दळणवळणाची साधने नसल्याने पोहोचत नाही. अशा परिस्थितीत छत्तीसगड राज्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर असलेले अनेक तरूण एटापल्ली, कोरची, सिरोंचा आदी भागातील दुर्गम गावांमध्ये अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. यांच्याकडे वैद्यकीय शास्त्राची कोणतीही पदवी नसल्याचे दिसून येत असतानाही या बोगस डॉक्टरांचा धंदा फोफावत आहे. एटापल्ली तालुक्याच्या गट्टा परिसरातील ताडगुडा येथे ५० ते ६० लोकसंख्येच्या गावात छत्तीसगडचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ घरपोच आरोग्यसेवा देत मनमानी पैसे आकारून आदिवासींचे आर्थिक शोषण करीत आहे. जिल्ह्णात बोगस डॉक्टर नसल्याचा दावा आरोग्य विभाग सातत्याने करीत आहे. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने नाईलाजास्तव नक्षलग्रस्त भागातील लोकांना आरोग्य तपासणी छत्तीसगडच्या बोगस डॉक्टरांकडून करावी लागत आहे. त्यामुळे अनेक लोकांचे चुकीच्या उपचारामुळे जीवही जाण्याच्या घटना घडलेल्या आहे. यांच्या हातून उपचार झालेले गंभीर रुग्ण नंतर अहेरी किंवा गडचिरोली येथे आणले जात असल्याचे अनेक घटनांवरुन उघड झाले आहे़ प्रयोगशाळा तंत्रज्ञांना वैद्यकीय क्षेत्राचे पूर्ण ज्ञान नसते. त्यांच्याकडून उपचार करून घेणे धोक्याचे आहे. मात्र दुर्गम भागातील रहिवाशांना कधीकधी नाईलाजास्तव उपचार करून घ्यावे लागतात. त्याचे दुष्परिणामही ते भोगतात. अशा डॉक्टरांपासून जनतेने सावध राहावे.- डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, अहेरी
छत्तीसगडचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनले महाराष्ट्रात डॉक्टर
By admin | Updated: January 2, 2015 01:24 IST