मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. सण उत्सव जरी असले, तरी आजपासूनच मतदारयाद्यांची तपासणी सुरू करा. घरोघरी जाऊन मतदारांना भेट द्या. गेल्या निवडणुकीत जी मतचोरी झाली, ४२ लाख मतदार वाढवले गेले, हे घुसलेले कोण आहेत, त्यांचा शोध घ्या, असे ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मुंबईतील शाखांचा दौरा सुरू केला आहे. रविवारी दहीसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. आजपासून प्रत्येक गटप्रमुखाने आणि प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागायचे आहे. आपल्या वॉर्डात मतचोर घुसलेत का, हे तपासा. नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यातले नाहीत, त्यांच्या नावाने बोगस मतदान होईल. मागच्या वेळी काही ठिकाणी दुबार, तिबार मतदान झाले.
माझा पक्ष हा पितृपक्षआता गणेशोत्सव आहे, नंतर पितृपक्ष येईल. पितृपक्ष मी माझाच मानतो, कारण माझा पक्ष हा पितृपक्ष आहे. माझ्या पित्याने शिवसेनेची स्थापना केली. ज्यांना काही आगापिछा नाही, त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.