ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - भाजपा नंतर आम आदमी पक्षाने आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर आपला मोर्चा वळवला आहे. जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणा-या अर्जुन खोतकरांवर आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खोतकरांनी ५०० कोटींचा घोटाळा केला असा मेनन यांनी आरोप केला. अर्जुन खोतकर जालना एपीएमसी मार्केटमधील घोटाळयाचे सूत्रधार आहेत. जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांविरोधात बोलणा-यांचे खून होतात असा आरोप मेनन यांनी केला.
खोतकरांनी बजाज, नाथानी कुटुंबाला फायदा मिळवून दिला तसेच खोतकरांशी संबंधित ४० लोकांनाच गाळे मिळाल्याचा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केला. अर्जुन खोतकर महाराष्ट्र सरकारमध्ये कपडा, दुग्धविकास आणि मत्स्य खात्याचे राज्यमंत्री आहेत. चौथ्यांदा ते जालन्यातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. राज्यात १९९९ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना ते राज्यमंत्री होते.