ठाणे : चांगल्या विचारांशी संगत करा. केवळ स्वत:चाच विचार न करता समाजासाठीदेखील चांगले करण्याची तयारी ठेवा. समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही स्वत:च बदला, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश शिंदे यांनी केले. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शनिवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदींकरिता व्यसनमुक्ती सप्ताह सांगता कार्यक्रम झाला. या वेळी आरोपमुक्त झाल्यावर भविष्यात कसे जगायचे, यावर प्रा. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आरोपमुक्त झाल्यावर कारागृहातून बाहेर पडल्यावर माणूस म्हणून कसे जगायचे, हा विचार प्रथम केला पाहिजे. नकळत आपल्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील. परंतु, येथून बाहेर पडल्यावर चांगल्या लोकांशी संगत करून स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता चांगला मार्ग पत्करावा, असे सांगताना देशासाठी लढलेल्या अनेक क्रांतिकारकांची उदाहरणे त्यांनी या वेळी उपस्थित बंदींना दिली. ।कारागृहातून सुटून बाहेर पडल्यानंतरही अनेकांना दोषी असल्यासारखे वाटत असते. मात्र, ही भावना मनात न ठेवता सतत चांगल्या गोष्टींचा विचार मनाशी असावा. वाल्याचा वाल्मीकी कसा झाला, याचे उदाहरण दिले. त्यानंतर, नशाबंदी मंडळाचे महाराष्ट्र राज्य प्रचारक रामकृष्ण दिगरसकर यांनी शायरी आणि गाण्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती या विषयावर उपस्थित बंदींचे प्रबोधन केले. कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव, उपअधीक्षक अंकुश सदाफुले, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आर.बी. जुटाळ उपस्थित होते.
‘समाजाचा दृष्टिकोन स्वत:च बदला’
By admin | Updated: July 4, 2016 03:39 IST