पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यास प्लँचेटचा वापर केल्यानेच पुण्यातील तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली करण्यात आली, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केला. पवार यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष होऊनही गुन्हेगारांचा तपास लागलेला नाही. पुण्याचे आयुक्त असताना पोळ यांनी प्लँचेटद्वारे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पत्रकार आशिष खेतान यांनी उजेडात आणला. त्यांच्या स्टिंग आॅपरेशनमुळे खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. यात जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास कारवाईचे आश्वासन दिले होते. त्याच काळात शासनाने पोळ यांची बदली केली. मात्र त्या वेळी सत्तेत असलेल्या पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
‘प्लँचेट’मुळेच पोळ यांची बदली!
By admin | Updated: February 26, 2015 03:02 IST