कोल्हापूर : तत्कालीन संयुक्त पुरोगामी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी कधी घातली नाही, घातली तर चोवीस तासांत उठविण्याचे काम केले; पण मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवारी कोल्हापुरात होणा:या प्रचार प्रारंभ मेळाव्यासाठी पवार आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
साखर दर घसरल्याने आगामी हंगामात साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढणार आहेत, अशा परिस्थितीत संसदेत निर्णय बदलण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले पाहिजे; पण काही मंडळी संसदेऐवजी बारामती व कोल्हापुरातच निर्णय बदलतात, असे वाटते असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप संपले की, समविचारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
ठीक राहायचे असेल तर कोल्हापुरातच यावे लागते
कोल्हापुरातून प्रचार प्रारंभाचे रहस्य विचारले असता, पवार म्हणाले, गेल्या 35 वर्षात माङया प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून करतो. हे माङो आजोळ असल्याने आवडते असेल हा भाग वेगळा आहे; पण रस्ता ठीक असेल तर येथील जनता पाठीशी राहते, जर ठीक नसेल तर जागाही दाखविते. त्यामुळे ठीक राहण्यासाठी कोल्हापुरात यावेच लागते.
आर.आर यांच्या विजयाबद्दल शंका नाही
गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या विजयाबद्दल माङया मनात कोणतीही शंका नाही. जे लोक आज त्यांच्याविरोधात उतरले आहेत, त्यांच्याशी टक्कर देऊनच ते राजकारणात मोठे झाले असल्याने तासगाव मतदारसंघातील जनता या निवडणुकीतही त्यांनाच बळ देईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
बारामतीचा टोल रद्द झाला कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची वीस एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नात काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नात लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल; परंतु त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार आम्हाला मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झाला नाही. यामुळे लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले,‘टोल विरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी फॅक्सवर मिळाले. परंतु याबाबत कृती समितीच्या प्रतिनिधींनी माङयाशी चर्चा केलेली नाही, असे ते म्हणाल़े