मुंबई : रेल्वेत आणि स्थानकांच्या हद्दीत फेरीवाल्यांचा वावर वाढला असून, त्यामुळे मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. फेरीवाल्यांची वाढलेली दादागिरी मोडीत काढण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मध्य रेल्वे ‘फेरीवालामुक्त’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत रेल्वे सुरक्षा दलातील वरिष्ठांची बैठक घेण्यात येईल. यात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठीचे नियोजन केले जाईल. रेल्वे स्थानक हद्दीत आणि ट्रेनमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानकांच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाले ठाण मांडून बसतात. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे पादचारी पूल आणि ट्रेनमध्येही फेरीवाले आपला व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारवाई करूनही पुन्हा ते आपले बस्तान मांडतात. गेल्या काही दिवसांत फेरीवाल्यांची दादागिरी व अरेरावी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. कल्याण ते कसारादरम्यान पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर सात जणांनी दरोडा घातला होता. यात सहभागी सातपैकी सहा जणांना लोहमार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटकेत असलेले सर्व आरोपी हे रेल्वे हद्दीत काम करणारे फेरीवाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आणि एकच खळबळ उडाली.ठाण्यातही फेरीवाले आणि काही प्रवाशांमध्ये झालेल्या वादानंतर फेरीवाल्यांकडून मारहाण होईल या भीतीने एका प्रवाशाने रुळावरच उडी टाकली. यात समोरून येणाऱ्या लोकलच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना आणि फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास पाहता मध्य रेल्वे फेरीवालामुक्त करण्याचा उद्देश आरपीएफकडून ठेवण्यात आला आहे. त्यासाठी दोन दिवसांत आरपीएफ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांसोबत बैठकही घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. (प्रतिनिधी)>पूर्ण बंदोबस्तफेरीवाल्यांवर नियमित कारवाई करून त्यांना दंड केला जातो. तरीही फेरीवाले पुन्हा बस्तान मांडतात. त्यामुळे स्थानक व ट्रेनमधून फेरीवाल्यांचा वावर पूर्णपणे बंद करण्यासाठी काही नियोजन केले जाणार असल्याचे भालोदे यांनी सांगितले.
मध्य रेल्वे फेरीवालामुक्त होणार
By admin | Updated: January 7, 2017 05:47 IST