पणजी : केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी नि:स्वार्थपणे काम करा, असे, प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसघंचालक मोहन भागवत यांनी येथे शुक्रवारी केले. दोनापॉवला येथे जायंट्स इंटनॅशनलच्या ४0व्या जागतिक अधिवेशनात ते बोलत होते. जायंट्सच्या जागतिक कार्यकारी अध्यक्षा शायना एन. सी़ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.भागवत म्हणाले, की प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे दिवस आलेले आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जण सक्षम बनतो आहे, असे आम्हाला वाटते. बदल घडविण्यासाठी सत्ताधारी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, परंतु ते पुरेसे नाहीत. समाजातील प्रत्येकाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांचा मार्ग वेगवेगळा असला तरी अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. तो मग लायन्स कल्ब असो, रोटरी की अन्य. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व संस्थांचा उगम विदेशी आहे. जायंट्स इंटरनॅशनल या देशी संस्थेकडून त्यामुळेच वेगळ्या अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले.जायंट्सचे उपाध्यक्ष राजेश जोशी, अधिवेशनाचे अध्यक्ष संदीप नाडकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढल्या
By admin | Updated: December 20, 2014 02:37 IST