औरंगाबाद : केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींच्या बाजूचे असून, ते देश घडविणाऱ्या कामगारांच्या मात्र विरोधात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली.भाजपा सरकार कामगारविरोधी ५४ कायदे बदलण्याच्या मनस्थितीत असून, आम्ही मात्र कामगारांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात दिला. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, इंटकचे राष्ट्रीय सरचिटणीस एम. राघवय्या यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते गोविंदराव आदिक, बाळकृष्ण वासनिक, काशिनाथ राऊत व अशोक पेंडारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चव्हाण म्हणाले, देशातील अन्य कामगार संघटना त्यांच्या राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणानुसार चालतात; पण इंटकचा पाया धर्मनिरपेक्षतेचा आहे. काँग्रेस आणि इंटक देश मजबूत करण्याचे काम करीत आहेत. रेड्डी म्हणाले, आम्हाला देशात काँगे्रसचे सरकार हवे आहे, पण इंटक म्हणून आम्हाला आमच्या ताकदीवर उभे राहू द्या. कामगारांना किमान १५ हजार रुपये वेतन मिळायला हवे, मात्र सरकार ते देण्यास तयार नाही. केंद्रातील लुटारूंकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?, असा सवाल मोहन प्रकाश यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील, के. के. नायर, दादा माहूरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने भांडत आहेत, ते पाहता राज्याची वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने चालू असल्याचे जाणवते. आपापसातील मतभेदांत ही मंडळी सरकार कसे चालवणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.राज्यस्तरीय इंटक अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला दिली त्याप्रमाणे महाराष्ट्राला मदत दिली पाहिजे. राज्यपालांनीसुद्धा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे. राज्य सरकार प्रत्यक्षात उपाययोजना करण्याऐवजी केवळ घोषणाबाजी करीत आहे. त्यामुळे यातून भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. संपूर्ण कर्जमाफी मिळायलाच पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. दुष्काळी उपाययोजनांसंबंधी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे. विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. अध्यक्षपदी पुन्हा छाजेड : महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. ‘अच्छे दिन’चे वादे करणाऱ्या सरकारमुळे आता अंधारी येण्याची वेळ आली आहे, असे छाजेड म्हणाले.
केंद्र सरकार कामगारविरोधी
By admin | Updated: September 14, 2015 02:03 IST