मुंबई : केंद्रात मुख्यमंत्र्यांची पत नाही त्यामुळेच ६२१३ कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागून एक छदामही महाराष्ट्राला मिळाला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. नियम ९७ अन्वये विरोधी पक्षाने तर नियम २६० अन्वये सत्ताधारी पक्षाने अवकाळी पाऊस, गारपीट व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर सभागृहात चर्चा उपस्थित केली होती. मुंडे म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्राने केंद्राकडे १०७३ कोटी मागितले तेव्हा केंद्राने ५४४ कोटी दिले होते. त्यानंतर ३२३२ कोटींची मागणी केली तेव्हा ७७८ कोटी दिले होते. यावेळी ६२१३ कोटी रुपयांची मागणी करूनही केंद्राने छदाम दिला नाही. त्यामुळे केंद्रात महाराष्ट्राची की मुख्यमंत्र्यांची पत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात भाजपाचे सरकार निवडून दिले तर मागील सरकारने मिळवून दिली त्यापेक्षा भरीव मदत देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. प्रत्यक्षात ४५ रुपये गुंठा या दराने मदत देऊ केली आहे, असे नमूद करून मुंडे म्हणाले की, सरकारने देऊ केलेल्या तुटपुंज्या मदतीत आपले १०० रुपये जमा करून शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेले धनादेश परत केले आहेत. असे काही धनादेश मुंडे यांनी सरकारला सुपूर्द केले. केंद्र सरकारच्या निकषांमुळे महाराष्ट्राला भरीव मदत मिळत नसेल तर ते निकष बदलायला लावा अथवा कर्ज काढा परंतु शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अशी मागणी त्यांनी केली.सभागृहनेते व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना उद्देशून मुंडे म्हणाले की, तुम्ही बांधावरील शेतकरी असतानाही खरीप हंगामात दुष्काळाची मदत घेतली असेल तर रब्बीच्या काळातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देता येणार नाही, अशी भूमिका कशी घेतली. तुमच्याकडून शेतकऱ्यांची अशी क्रुर चेष्टा अपेक्षित नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या तीव्र भावनांशी सहमत व्यक्त करीत गावागावात फिरणे मुश्कील झाल्याचे मुंडे म्हणाले. अगोदर दुष्काळ, नंतर गारपीट आणि आता अवकाळी पाऊस राज्यातील सरकारचा पायगुण चांगला नाही, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली. यावेळी माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर आदींची भाषणे झाली.
केंद्रात मुख्यमंत्र्यांची पत नाही !
By admin | Updated: March 12, 2015 01:55 IST