मुंबई : लहान मुलांना पळवून नेणारी टोळी मुंबईत कार्यरत झाल्याचे समोर आले आहे. एका सात वर्षाच्या मुलीला मुंबई सेन्ट्रल येथून पळवून नेणारी महिला सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. गेल्या १३ दिवसांत या मुलीचा अद्याप पत्ता लागला नसून नागपाडा पोलिसांनी आरोपी महिलेचे रेखाचित्र जारी केले आहे. सात वर्षाची निशा (बदलेले नाव) आपल्या आईवडीलांसोबत मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकानजीक असलेल्या फ्लायओव्हरवरील फुटपाथवर राहात होती. या ठिकाणी एक महिलाही राहण्यासाठी आली होती. या महिलेने निशा आणि तीच्या कुटूंबियांशी मैत्री केली. त्यानंतर २९ जानेवारी रोजी निशाचे आईवडील हे कामानिमित्त बाहेर गेले आणि पुन्हा परतले तेव्हा निशा गायब झाल्याचे त्यांना समजले. त्यावेळी त्यांच्या शेजारीच राहणारी महिलाही गायब असल्याचे त्यांना दिसले. याबाबत निशाच्या पालकांनी नागपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पायधुनीतही झाला प्रयत्नपायधुनीत राहणाऱ्या पाच वर्षाची मेघना हिलादेखिल दोन दिवसांपूर्वीच पळविण्याचा प्रयत्न झाला . यात मेघनाला पळविणारा सागर शर्मा (२८) याला स्थानिकांनी पाहिले आणि त्याचा पाठलाग करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. सागर हा इगतपुरी येथे राहणारा असून पोलिस अधिक तपास करत आहे.