ऑनलाइन लोकमत -
मालेगाव (नाशिक), दि. 07 - मुस्लिम बांधवांच्या सर्वश्रेष्ठ आणि पवित्र 'रमजान ईद' निमित्ताने शहरातील लाखो मुस्लिम बांधवांनी पोलीस कवायत मैदानावर ईद-ऊल-फित्र नमाज अदा केली. उत्साहात व पारंपारिक पध्दतीने शांततेत ईद साजरी करण्यात आली. या नमाजचे नेतृत्व शहराचे मुख्य ईमाम - व-खतिब मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केले. नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट करून एकमेकांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय एकात्मता समिती व शासनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रांताधिकारी अजय मोरे, अप्पर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा सत्कार करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत देशात कुठेही चंद्र दर्शन न झाल्याने नियोजित बुधवारी होणारी ईद गुरुवारी साजरी करण्यात आली. बुधवारी चाँदरातच्या रात्री मुस्लिम बांधवांनी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी ईदची नमाज अदा करण्यासाठी ईदगाह कडे येणारे शहरातील सर्वच रस्ते अबालवृधांनी खच्चून भरलेले दिसत होते. या रस्त्यावर मनपा, सामाजिक संस्था व हिंदू बांधवांनी एकतेचे दर्शन घडवित सालाबादप्रमाणे वजु करण्यासाठी तात्पुरती पाण्याची व्यवस्था केली होती.