मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातून दोन घरे घेणाऱ्यांवर खटले दाखल करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केले़महत्त्वाचे म्हणजे या कोट्यातून दोन घरे घेणाऱ्याने त्यातील एक घर सरकारला परत केले अथवा ते विकून बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत शासनाकडे जमा केली तरीही त्याच्यावर खटला दाखल करणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे़ न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले़ तसेच याच न्यायालयाने मार्च महिन्यात आदेश दिल्याप्रमाणे या कोट्यातून घरे वितरित करणे बंद केले असल्याची माहिती सरकारी वकील जे़पी़ याज्ञिक यांनी खंडपीठाला दिली़ मात्र मार्च महिन्यातील आदेशानुसार या कोट्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे की नाही याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले़या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे़ या कोट्यातून दोन घरे घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे़ त्यावर न्यायालयाने या कोट्यातून दोन घरे घेणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाणार, असा सवाल गेल्या सुनावणीत केला होता़ त्याचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने वरील माहिती दिली़ (प्रतिनिधी)
दोन घरे घेणाऱ्यांवर खटला
By admin | Updated: June 18, 2014 05:17 IST