नांदुरा (जि. बुलडाणा) : कोळसा घेवून जाणार्या मालगाडीच्या डब्याला आग लागल्याची घटना आज २५ डिसेंबरच्या सकाळी ११ वा. उघड झाली. रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्यामुळे वेळीच आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला. आज सकाळी भुसावळकडून नागपुरकडे कोळसा घेवून जात असलेल्या एका मालगाडीतील इंजीनपासून २५ नंबरच्या डब्यातून धूर येत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब सदर माहिती नांदुरा येथील रेल्वे स्टेशन अधिक्षक कांबळे यांना दिली. कांबळे यांनी त्वरीत गाडी थांबविण्याचे निर्देश दिले व तातडीने नांदुरा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. नगर परिषदेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक विजय कोल्हे यांच्यासह कर्मचारी अग्निशामक दलाची गाडी घेवून घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्याकरीता अग्निशामकचे दोन बंब लागले. नांदुरा शहरातच अग्निशामक सेवा उपलब्ध असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मालगाडीच्या डब्याला आग
By admin | Updated: December 25, 2014 23:44 IST