भिवंडी : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या बनविलेल्या हेलिपॅडकरिता खाडीतील पाण्याचा वापर केला होता अशी माहिती भाजपाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेहळे गावात झालेल्या किसान ग्रामसभेसाठी कृषीमंत्री नुकतेच येऊन गेले. त्यांच्या हेलिपॅडसाठी पिण्याचा पाण्याचा वापर केला असा आरोप विरोधकांनी केला होता. भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला भाजपाने गुरूवारी उत्तर दिले. अंजूरगावी हेलिपॅड बनविले होते. त्यासाठी लागणारे पाणी जवळील खाडीतून टँकरव्दारे आणून ते वापरण्यात आले होते. परंतु विरोधकांनी याचे राजकारण करत पिण्याचे पाणी वापरल्याचा प्रचार करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविला अशी टीका चोरघे यांनी केली. तसेच लोढाधाम मध्ये पाण्याचे स्वतंत्र स्त्रोत असून त्याव्दारे बगीचा व साईभक्तांना पाणी पुरविले जाते. त्यामुळे हेलिपॅडसाठीअथवा इतर कामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होणे शक्यच नाही. विरोधकांचा आरोप म्हणजे खोडसाळपणा असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
हेलिपॅडसाठी वापरले खाडीचे पाणी
By admin | Updated: April 29, 2016 04:11 IST