देश विदेशातील ५०० वर सुंदरी होत्या संपर्कातनागपूर : कॉल गर्ल्सचे ‘रॅकेट’ चालविणाऱ्या एका बड्या दलालास शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पथकाने अटक केली. हा दलाल देश विदेशातील सुंदरींना करारावर नागपुरात आणून बड्या हॉटेलांमध्ये आंबटशौकीन राजकारणी, बडे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना त्यांचा पुरवठा करून देहव्यापार करीत असल्याच्या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे. सचिन सोनारकर, असे या दलालाचे नाव असून तो पांढराबोडी भागातील रहिवासी आहे. पोलीस पथकाने २६ डिसेंबर रोजी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल अर्जुनवर धाड घालून मुंबई येथील एक आणि नागपुरातील दोन सुंदरींना पकडले होते. त्यांना ग्राहकांसाठी या हॉटेलमध्ये पोहचविणारा मनीष बाबूराव रामटेके रा. संजयनगर पांढराबोडी आणि खोली उपलब्ध करून देणारा हॉटेलचा व्यवस्थापक चेतन सारंग सातपुते यांना अटक केली होती. या धाडीनंतर या पथकाला कॉल गर्ल्सच्या बड्या रॅकेटचा छडा लागला आणि त्यांनी या शहरातील बड्या हॉटेलांमध्ये देहव्यापार चालविणाऱ्या सचिन सोनारकर याला अटक केली. सोनारकर हा मनीष रामटेके याचा मामा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही या धंद्यासंदर्भातील पाच-सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनारकर हा रशिया,नेपाळ, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आदी बड्या शहरातील सुंदरींना ८० हजार ते १ लाखाच्या करारावर नागपुरात आणत होता. या सुंदरींच्या मुक्कामासाठी त्याने विविध भागात चार आलिश्यान फ्लॅट भाड्याने घेतले होते. त्यांना हॉटेलांमध्ये पोहचविण्यासाठी चार आलिशान मोटारगाड्यांची व्यवस्था केली होती. एका ‘नाईट’ साठी ग्राहकांकडून ७ हजार ते ३५ हजार रुपये घेतले जात होते. सोनारकर याला दोन बायका असून तो देहव्यापाराच्या या धंद्यात मालामाल झालेला आहे. त्याच्या संपर्कात ५०० ते ६०० सुंदरी असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या छायाचित्रांसह पोलिसांच्या हाती लागली आहे. (प्रतिनिधी)दोन दिवसांचा पीसीआरया प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी आज आरोपी सचिन सोनारकर याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. दूरवर पसरलेल्या या देहव्यापारात आणखी कुणाचा सहभाग आहे, हे हुडकून काढण्यासाठी सरकार पक्षाने सोनारकर याच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. या व्यवसायात बॉडीबिल्डर रितेश बैसवारे याच्या खून प्रकरणातील आरोपी पुरंदर ऊर्फ पाजी राम यादव रा. वर्मा ले-आऊट याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याला मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यासाठी न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट घेण्यात आलेला आहे.
कॉल गर्ल्स रॅकेटर जाळ्यात
By admin | Updated: January 30, 2015 01:00 IST