विठ्ठल कवडे
पंढरपूर, दि. 12 - पंढरपुरातील आषाढी यात्रेदरम्यान भरणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. स्टॉलधारक कंपन्यांनी स्टॉलचा ताबा घेतला आहे. दरम्यान या कृषी प्रदर्शनाचे १६ लाख शेतकऱ्यांना रिलायन्स कंपनीद्वारे कॉल करून आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे व्यवस्थापक संदीप गिड्डे यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये प्रशस्त पेंडॉल टाकण्यात आला आहे. प्रत्येक स्टॉलसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. आकर्षक आच्छादन व प्रशस्त जागा तयार करून आता बाजार समितीसह सर्व कृषी विभाग सज्ज झाला आहे. दरम्यान रिलायन्स जी.ओ. कंपनी राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांसह १६ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी चार वेळा डायरेक्ट कॉल करून या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला आमंत्रित करणार आहे.जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना पत्रिका देऊन या कृषी प्रदर्शनाला आमंत्रित करण्यात येत आहे. चार हजार गाड्या, स्वतंत्र एक व्यक्ती स्पिकरवर पंढरपूर शहर व श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही या प्रदर्शनाचा प्रचार करीत आहे.१४ जुलै ते १९ जुलै दरम्यान भरणाऱ्या या कृषी प्रदर्शनात ४०० स्टॉल सजणार आहेत. या प्रदर्शनाला श्रीसंत सावता माळी कृषीनगरी असे नाव देण्यात आले आहे. प्रदर्शनाचे निमंत्रक आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री गुरूवारी ४ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. तर अध्यक्षस्थानी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला माजीमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलससंधारण व राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंपदा, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी, पणन तथा फलोद्यान राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. शिवाय महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार, कृषी आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी रणजितकुमार, विस्तार व प्रशिक्षण संचालक डॉ. के. व्ही. देशमुख, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक एम. आर. मोरे, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज बिराजदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पोपट रेडे, उपसभापती संतोष घोडके यांनी दिली.कोट ::::::::::::::::::::::::पावसाळ्याचे दिवस असल्याने स्टॉलधारक व प्रदर्शनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी वॉटर प्रुफ पेंडॉल तयार केला आहे. नोंदणी झालेले स्टॉलधारक आले असून त्यांनी आपल्या उत्पादन, प्रोजेक्ट आपल्या नोंदणी केलेल्या जागेवर लावण्यास सुरूवात केली आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आ. प्रशांत परिचारक, संचालक उमेश परिचारक प्रयत्न करीत आहेत. आषाढी यात्रेतील हे ह्यकृषी पंढरीह्ण कृषी प्रदर्शन राज्यात एक आदर्श कृषी प्रदर्शन होईल.- संदीप गिड्डेव्यवस्थापक, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, पंढरपूर