मुंबई : अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या ‘कबाली’ सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी जगभरातील सिनेमागृहांवर ‘रजनीकांत’ स्टाईल धुमाकूळ घातला. माटुंग्याच्या ७४ वर्ष जुन्या अरोरा सिनेमागृहात ‘कबाली’च्या शोकरिता खास व्यवस्था करण्यात आली आहे. तमिळबहुल भागात असलेल्या या सिनेमागृहात ७०० आसनव्यवस्थेत सहा शो दाखवले जाणार आहेत. शुक्रवारी सकाळी ६ च्या शोसाठी या ठिकाणी चाहत्यांनी पहाटे साडेतीन वाजल्यापासून प्रचंड संख्येने गर्दी केली.अरोरा सिनेमागृहात सकाळी ५ वाजता रजनीकांतच्या फोटोला दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहिला शो सुरू करण्यात आला. काही चाहते पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करीत सिनेमागृहात पोहोचले. तर काही चाहते कबालीच्या गाण्यांवर रस्त्यावरच थिरकताना दिसले. या सिनेमाचे वीकेंडपर्यंतचे सर्वच शो हाऊसफुल आहेत. पाऊस सुरू असतानाही सकाळी या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी रजनीकांतच्या चाहत्यांनी सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या आनंदात रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, खाऊच्या पाकिटांचे वाटप असे वेगवेगळे उपक्रमही सिनेमागृहाच्या आवारात राबविले.सिनेमा सुरू असताना प्रेक्षकांनी टाळ््या, शिट्ट्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला दाद दिली. रजनीकांतच्या एन्ट्री सीनच्या वेळीही प्रेक्षकांनी खुर्च्यांवरून उठून सुपरस्टारचे कौतुक केले. रजनीकांतचा एन्ट्री सीन दीड मिनिटांचा असून, तो स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना तो एन्जॉय करता यावा. १५२ मिनिटांचा हा चित्रपट देशविदेशांमध्ये चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. (प्रतिनिधी)
‘कबाली’साठी सिनेमागृह ‘हाऊसफुल्ल’
By admin | Updated: July 23, 2016 02:18 IST