कऱ्हाड : ‘देशात बैलगाड्या शर्यतींना बंदी असताना महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब राज्यांतील खासदार, आमदार तसेच बैलगाड्या मालकांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे बैलगाड्या शर्यती सुरू करण्याची मागणी केली आहे. या शर्यती काँग्रेस सरकारने बंद केल्या आहेत. त्या आम्ही सुरू करणार आहोत. लवकरच यासंदर्भात कायदा करण्यात येईल आणि जानेवारी २०१६ मध्ये बैलगाड्या शर्यती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल,’ असे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.बैलगाड्या शर्यतींवरील बंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राज्यातून एका शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली व मागण्यांचे निवेदनही दिले. बैलगाड्या चालक-मालक संघटनेचे राज्याध्यक्ष धनाजी शिंदे, नितीन शेवाळे, संदीप बोदगे, रामकृष्ण चकलकर, विजय काळे, महेश शेवळई, अण्णासहेब भोंगडे, मुकुंद हाडे यांच्या माध्यमातून खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार अमरजित साबळे, आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी देशातील बैलगाड्या शर्यती सुरू करण्याबाबतचा आग्रह धरला आणि याबाबतचे निवेदन देण्यात आले.शेतीपूरक व्यवसाय म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. तो अडचणीत आला आहे. बैलगाड्या शर्यतीला बंदी आल्यामुळे बैलगाडी चालक-मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बैलगाड्या शर्यतींवरील बंदीमुळे चालक, हातगाडीवाले यांसह अनेक व्यावसायिकांचा प्रपंच रस्त्यावर आला आहे. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे संघटनेचे राज्याध्यक्ष धनाजी शिंदे यांनी केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून बैलगाड्या शर्यती निश्चित सुरू करण्यात येतील, असे जावडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बंदीमुळे शौकिनांची निराशादेशातील बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली गेल्याने बैलगाड्या शर्यतींच्या शौकिनांची निराशा झाली आहे. त्याचप्रमाणे बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या बैलगाडी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची आम्ही भेट घेतली असून, याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.- धनाजी शिंदे, राज्याध्यक्ष,बैलगाड्या चालक-मालक संघटना
बैलगाड्यांच्या शर्यती होणार सुरू
By admin | Updated: December 31, 2015 00:32 IST