मुंबई : पोलिसांकडील चौकशी बंद करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या पोलीस कॉन्स्टेबल परशुराम चाळके याला चार वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष सत्र न्यायाधीश रणपिसे यांनी ही शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. गेल्या वर्षी चाळके हा वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले होते.वाकोला परिसरात राहत असलेल्या एका तरुणाची वाकोला विभागातील सहायक आयुक्तांच्याकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती, एसीपी साहेबांशी बोलून हे प्रकरण बंद करतो, असे चाळकेने सांगत दोन हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम स्वीकारत असताना तो रंगेहाथ मिळाला होता. पोलीस निरीक्षक लोकेश कानसे यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्या. रणपिसे यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात चाळकेने लाच घेतल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाल्याने कलम ७ लाच प्रतिबंधक कायदा, १९८८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि १३(२) ला.प्र.का. १९८८अन्वये ४ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दोन्ही शिक्षांतील दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. या खटल्यास सरकारी वकील म्हणून लाडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
लाचखोर पोलिसाला ४ वर्षांचा कारावास
By admin | Updated: September 15, 2015 02:53 IST