मनसे फॅक्टरमुळे झालेल्या मतविभागणीने २००९ साली काँग्रेस आघाडी २० जागांवर यशस्वी ठरली. तर युतीला केवळ ९ जागा मिळाल्या. तर, नवख्या मनसेने सहा जागा खेचल्या. गेल्यावेळी मराठी मतांचे विभाजन प्रभावी ठरले; यंदा मात्र मतांचे ध्रुवीकरण निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. १५ टक्क्यांच्या आसपास असणारा गुजराती समाज आणि २५ टक्के मराठी समाज कोणाच्या बाजूने झुकतो यावरच निकाल अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबईतील अस्तित्व अगदीच तोळामासाचे असल्याने काँग्रेसच्या स्थानिक समीकरणांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. काँग्रेसची परंपरागत मते आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत जनसंपर्क यांचे गणित जमले तरच काँग्रेसला २००९ ला मिळालेल्या जागांच्या आसपास जाता येईल. मतविभाजनामुळे विधिमंडळात काँग्रेसच्या मुंबईकर आमदारांची संख्या १७ झाली. पण, यातील चार-पाच अपवाद वगळता बाकी कुणाला मतदारसंघ बांधावा, मतदारांच्या संपर्कात राहावे, त्यांची कामे करावीत, असे वाटल्याचे दिसले नाही. शिवसेना-भाजपा युतीबाबत मात्र वेगळी परिस्थिती आहे. मराठी मतदार सेनेकडे तर उत्तर भारतीय आणि गुजराती मते भाजपाची अशीच जणू ही विभागणी होती. युती फुटल्यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेला फुंकर घालत मराठी मते जवळ करण्याचा प्रयत्न केला. गुजराती विरोधी प्रचाराने सोशल मीडियावर टोक गाठले. मराठी मते स्वत:कडे वळविण्यात काही प्रमाणात शिवसेना यशस्वी ठरल्याचे चित्र सध्या आहे. मात्र, गुजराती आणि उत्तर भारतीय मतांच्या बेरीज भाजपाला मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीला आणणार का, हा कळीचा मुद्दा आहे. केवळ शिवसेनेच्या मेहेरबानीवर भाजपा जिंकते, या गृहीतकाला धक्का बसणार आहे. भाजपाचा यश निर्विवादपणे त्यांचे स्वत:चे असेल. असेच काहीसे मनसेबाबत ठरणार आहे. लाटेमुळे मिळालेले यश पक्षसंघटनेच्या आधारे टिकवावे आणि वाढवावे लागते. मनसे नेत्यांनी काय केले, हेच निकालातून प्रतिबिंबित होणार आहे.
व्यक्तिगत जनसंपर्कच ठरणार निर्णायक
By admin | Updated: October 16, 2014 04:36 IST