दासगांव : मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या झाडांना लागणारी आग तसेच काही कारणांमुळे सुकलेली झाडे ही दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तसेच मोठ्या पावसात वाहतुकीला अडथळ्याची ठरतात. जून महिन्याच्या सुरुवातीला वादळी वाऱ्याच्या पावसातच राष्ट्रीय महामार्गावर ही झाडे कोसळून महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पावसाअगोदर लक्ष घालून झाडांची तोड करून पुढील अडथळा दूर करण्याची मागणी नागरिकांसह वाहनचालकांची आहे.दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीलाच विजेच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यास वादळी पावसाला सुरुवात होते. महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग हा जवळपास ७० टक्के डोंगर भागाला लागून आहे. जंगल भागाला लागणारी आग हे जंगल जाळत थेट महामार्गापर्यंत येते किंवा या राष्ट्रीय महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांकडून ही झाडे जळली जातात. मात्र ही झाडे ओली असल्याने अर्धवट बुंध्याला जळून उभी असतात. तर दरवर्षी अनेक झाडे राष्ट्रीय महामार्गालगतची वीज कोसळून खाक झालेली उभ्या अवस्थेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत महाड तालुका हद्दीत अनेक झाडे जळून अर्धवट उभी आहेत. तर अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. मात्र दरवर्षी अशी झाडे वादळी पावसातच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कोसळतात.दरवर्षी या सुरुवातीच्या पावसातच झाडे पडल्याने महामार्ग ठप्प होत असतो. यामुळे पावसाआधी अशा झाडांची तोड करावी अशी मागणी होत आहे.
महामार्गावरील धोकादायक झाडे तोडा
By admin | Updated: May 30, 2016 02:28 IST