श्यामकुमार पुरे/राजू बनकर, आमठाणा (जि. औरंगाबाद)सख्खा भाऊ असलेल्या पोलीस पाटलानेच मनोरुग्ण ठरवून, २० वर्षांपासून काळकोठडीत डांबून ठेवलेल्या देऊळगाव बाजार येथील दुर्दैवी तरुणाची ‘लोकमत’च्या बातमीनंतर पोलिसांनी मुक्तता केली. मंगळवारी या तरुणाने मोकळा श्वास घेतला. अंधार कोठडीत कोंडलेल्या अर्जुन इंगळे (३९) यांची मंगळवारी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सुटका केली. ‘अर्जुन २० वर्षांपासून भोगतोय काळकोठडी’ हे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तातडीने देऊळगाव बाजार गाठून अर्जुनची सुटका केली़अर्जुन यांनी अंधाऱ्या कोठडीतून बाहेर येताच, त्याने कोणालाही इजा पोहोचवली नाही. आपले नाव, गाव, शिक्षण आदी माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. सिल्लोड येथे उपचार केल्यानंतर पुढे औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उपचारानंतर त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येईल़ न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी सांगितले.गावकऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या पथकाने अर्जुन यांची सुटका केली.
तरुणाची काळकोठडीतून मुक्तता
By admin | Updated: October 28, 2015 02:26 IST