विलास गावंडे ल्ल यवतमाळबोगस कार्डाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता कठोर पावले उचलली असून, थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेशच संबंधितांना दिले आहेत़ प्रवासादरम्यान असा प्रवासी आढळल्यास बस थेट पोलीस ठाण्यात नेऊन रितसर तक्रार देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ वाहकाने दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई झाली, याचाही आढावा घेतला जाणार आहे.एसटीची प्रवास सवलत लाटण्यासाठी बोगस कार्डचा वापर होत असल्याची बाब पुढे आली आहे. विशेषत: अपंगांच्या बाबतीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांबाबतही असे होत आहे. तहसीलदार, समाज कल्याण विभागाचे बनावट कार्ड तयार करून आणि मतदान कार्डावरील तारीख पद्धतशीर बदलून प्रवास सवलत घेतली जाते. यातूनच एसटीचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फौजदारी कारवाईचा पर्याय शोधण्यात आला.बोगस कार्डवर प्रवास करताना किंवा करण्याचा प्रयत्न करताना कुणी आढळल्यास बस थेट पोलीस ठाण्यात लावून रितसर तक्रार केली जाणार आहे. यासाठी वाहकाला तक्रार कशा प्रकारे करावी, यासाठीचा नमूना दिला जाणार आहे. त्यात संबंधित व्यक्तीने सवलतीसाठी कुठल्या प्रकारचे आणि कुणाच्या स्वाक्षरीचे कार्ड वापरले, प्रवास कोठून कुठपर्यंत करत होता आदी बाबींची माहिती नोंदवावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी तक्रारीवर काय कारवाई केली, याची माहिती घ्यावी लागणार आहे. बोगस कार्डवर प्रवास करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद यापूर्वीही होती. परंतु आता ती अधिक तीव्र करण्यात आली आहे. आता वाहकांना कार्डाची तपासणी बारकाईने करावी लागणार आहे. मार्गात कुठे वाहन तपासणी होऊन बोगस कार्डधारक आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तपासणी झाल्याच्या ठिकाणापासून लगतच्या पोलीस ठाण्यात बस नेऊन थेट तक्रार केली जाईल.च्एखाद्या व्यक्तीचे कार्ड बोगस असल्याचा संशय आला तरी पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. अशा व्यक्तीला पूर्ण तिकीट घेण्यास सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र जाणीवपूर्वक तिकीट चुकविणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यात येणार आहे. कर्णबधिर प्रकारातील सवलत कार्ड असणाऱ्यांबाबत अनेक तक्रारी होत्या. मात्र आता ही प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने प्रमाण कमी होईल, असे सांगितले जाते.
बोगस कार्डधारकांवर एसटीची कुऱ्हाड
By admin | Updated: January 20, 2015 01:51 IST