ऑनलाइन लोकमत
पेठ (नाशिक), दि. 19 - गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय विवाहित युवकाचा मृतदेह गावाबाहेरील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने चार दिवसा पूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बोर्डींगपाडा येथील अनिल धनराज पवार हा 14 जूलैपासून घरातून काहीही न सांगता निघून गेला. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी पेठ पोलीसात हरवल्याची तक्रारही दाखल केली. सहा दिवसानंतर मंगळवारी सकाळी पेठच्या नजिकच्या जंगलात आंब्याच्या झाडाला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह लटकलेला गुराख्यांना दिसून आला. पेठ पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता पावसामुळे मृतदेह कुजला होता. अंगावरील कपडे व भ्रमणध्वनीवरून सदरचा मृतदेह अनिल पवार याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखला. जागेवरच वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत पवार याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असून तो पेठमध्ये फळे विक्रीचा व्यवसाय करत होता.(वार्ताहर)