नागपूर : तात्या टोपेनगरमध्ये एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ‘नीरी’मध्ये वैज्ञानिक होते. ते संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा निरंजन मुंबईत राहतो. तर, लहान मुलगा आदित्य व त्याची पत्नी नीलिमासोबत त्या राहत होत्या. नेहमीप्रमाणे आदित्य आणि नीलिमा हे सकाळी पावणेदहाच्या सुमारास कामावर निघून गेले. वसुंधरा या १० महिन्यांच्या ‘आद्या’ या नातीसमवेत घरीच होत्या. सव्वादहाच्या सुमारास आशा इंगळे ही घरकाम करण्यासाठी आली. वसुंधरा यांनी बराच वेळ दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आशानेच दरवाजा जरासा ढकलला असता, तो उघडला. घरात येताच वसुंधरा जमिनीवर पडल्या असल्याचे तिला दिसून आले. जवळच चिमुकली आद्या बसून रडत होती. वसुंधरा यांचा दुपट्ट्याने गळा आवळल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी श्वानपथकाच्या साह्याने धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला.
नागपूरमध्ये दिवसाढवळ्या वृद्धेचा खून
By admin | Updated: October 8, 2015 02:24 IST