ऑनलाइन लोकमतइस्लामपूर, दि. 8 - येथील लोकराज्य विद्या फाऊंडेशनच्यावतीने स्मशानभूमीची स्वच्छता आणि रक्तदान या मरावे परी कीर्तीरूपी उरावे अभियानाची सुरुवात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करून रचलेल्या सरणावर झोपून रक्तदान करण्याच्या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली.यावेळी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, स्मशानभूमीत रक्तदान करणे आणि एक हजार स्मशानभूमींची स्वच्छता करणे, हा उपक्रम कौतुकास्पद आहे. स्मशानभूमी स्वच्छतेच्यादृष्टीने नेहमीच दुर्लक्षित राहणारी जागा आहे. समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा. आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील म्हणाले की, स्मशानभूमींची स्वच्छता हा उपक्रम मानवी जीवनाला आरोग्य संपन्न बनविणारा आहे.तांदळे म्हणाले, स्मशानभूमीविषयी समाजात अंधश्रद्धा आणि विविध प्रकारची भीती असते. या रूढी, परंपरा झुगारून देण्यासाठी स्मशानभूमीत रक्तदान केले. येत्या तीन वर्षांत राज्यातील एक हजार स्मशानभूमींची स्वच्छता करणार आहोत. स्मशानभूमीतच वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्याख्यानमाला, पारायण असे उपक्रम राबविणार आहोत. सुधीर मोरे, अमित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक प्रदीप लोहार, सतीश महाडिक, राजेंद्र पवार, दिनकर कोळेकर, रामचंद्र घुले, महेश परांजपे, सुरेश ताटे, संदीप वडार, निरंजन पाटील, वैभव खोत, संजय जाधव, विजय कुंभार, मानसिंग ठोंबरे, विनोद कोळेकर उपस्थित होते.
इस्लामपुरात स्मशानभूमीत रक्तदान
By admin | Updated: May 8, 2017 20:14 IST