यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट देण्याची मुस्लिम धर्मातील पद्धत न्यायप्रविष्ठ असताना आणि या विषयावर देशभर चर्चा होत असताना आता या मुद्यावर भाजपाचे विस्तारक आणि कार्यकर्ते मुस्लिम महिलांशी चर्चा करणार आहेत. भाजपाचा प्रचार, प्रसार, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते ३० मे ते १४ जून या काळात विस्तारक म्हणून काम करणार आहेत. या १५ दिवसांत ते त्यांच्या घरी जाणार नाहीत. कार्यकर्ते, सामान्यांकडे मुक्काम करतील. या विस्तारकांना नेमून दिलेल्या कामांमध्ये त्यांनी मुस्लिम महिलांना भेटून तीन तलाकविषयी त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांच्या सशक्तीकरणाच्या योजना, उपक्रमांची माहिती द्यावी, त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करावे, असेही सांगण्यात आले आहे. या १५ दिवसांत सगळे विस्तारक हे बूथमध्ये सायकलने फिरतील, त्या सायकलवर पक्षाचा झेंडा व बोर्ड असेल. एनजीओ, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक, पुजारी, प्रवचनकार, कीर्तनकार, व्यापारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संघ परिवारातील कार्यकर्ते, अन्य पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, सोशल मीडियातील कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनाही हे विस्तारक भेटतील. पत्रकार वा प्रसार माध्यमातील कोणाला भेटण्याची कोणतीही सूचना कार्यक्रम पत्रिकेत नाही. भविष्यामध्ये भाजपा वा भाजपा विचार परिवारास उपयोगी पडणाऱ्या लोकांची यादी तयार करावी, भाजपामध्ये येण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची यादी तयार करावी, असे आदेश विस्तारकांना देण्यात आले आहेत. या विस्तारकांमध्ये महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जि.प.पंचायत समिती, ग्राम पंचायतींचे सदस्य, पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते आदींचा समावेश असेल. त्यांना रोजच्या रोज विस्तारक म्हणून काय केले याची नोंद डायरीत करावी लागेल.
ट्रिपल तलाकबाबत भाजपाचा मुस्लीम महिलांशी संवाद
By admin | Updated: May 25, 2017 01:51 IST