कल्याण : साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणाºया भाजपकडून भविष्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. यात काही आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाही. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे हे जिवंत असते, तर त्यांनाही भाजपने या निवडणुकीत उमेदवारी दिली असती, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली.पश्चिमेतील कल्याण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी दुपारी झाला. यावेळी सावंत बोलत होते. प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे शहिदांचा अपमान झाला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांवर नाही, तर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागत आहेत. मात्र, प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य व्यक्तिगत असल्याचे सांगून भाजपने त्यांची पाठराखण केली आहे. याप्रकरणी स्वत: मोदी यांनी शहिदांची माफी मागावी. अन्यथा, जनता या निवडणुकीत भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रज्ञा सिंह यांच्या तोंडातून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत आहे. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत होऊ शकत नाही, असे सावंत यावेळी म्हणाले.
'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:31 IST