ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - " भाजप व आरएसएसची भीती दाखवून काँग्रेस- राष्ट्रवादी मुस्लिमांची मते घेत आली. आता या दोन्ही काँग्रसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लढण्याची ताकद राहिलेली नाही," अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली. उत्तर नागपुरातील गरीबनवाजनगर येथे मंगळवारी ओवेसी यांनी एमआयएमच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेतली. सभेत त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. " दोन्ही काँग्रेसने मुस्लिमांची मते घेतली, पण त्यांना न्याय दिला नाही. उलट दहशतवादाचे आरोप लावून मुस्लिम तरुणांना तुरुंगात टाकले," असा आरोप त्यांनी केला. " राष्ट्रवादीची मते मोदींच्या झोळीत गेली आणि दुसरीकडे मोदी यांनी शरदराव...शरदराव... म्हणत पवारांना पद्मविभूषण दिले," असा चिमटा त्यांनी काढला. " पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळे हजारो लोकांचा रोजगार बुडाला. मोदी सत्तेत आल्यापासून देशात अधिक दहशतवादी घुसल्याची आकडेवारी सांगत मोदी हे फक्त दुल्हे भाई की तलवार हवेत फिरवत आहे," असा टोला त्यांनी लगावला. नागपुरात विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणाही त्यांनी केली.
भाजपा, आरएसएसशी लढण्याची ताकद काँग्रेस-राकाँमध्ये नाही - असदुद्दीन ओवेसी
By admin | Updated: February 14, 2017 20:16 IST