भार्इंदर : जास्त पैशांचे आमिष दाखवून शेकडो महिलांना कोट्यवधींना फसविल्याप्रकरणी भाजपाची महिला युवा प्रदेश उपाध्यक्ष करिष्मा पुनमियाला अटक करण्यात आली आहे. गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या तक्रारीवरून भार्इंदर पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली.पुनमियाने भार्इंदर येथील मॅक्सस मॉल परिसरातील कृष्णकुंज इमारतीमध्ये ‘गोल्ड किटी पार्टी’ नावाचे कार्यालय सुरू केले होते. त्यात ‘सेव्हिंग अॅण्ड लॉट्स आॅफ फन’ नावाची गुंतवणूक योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये महिलांनी प्रत्येक महिन्याला १ हजार रुपयांप्रमाणे ३ वर्षांकरिता गुंतवणूक केल्यास त्यांना मुदतीनंतर ४१ हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार, काही महिलांचे ग्रुप तयार करून प्रत्येक ग्रुपमध्ये सुमारे ५०० महिलांना सदस्यत्व देण्यात आले. सदस्य महिलांसाठी प्रत्येक महिन्याला किटी पार्टीचे आयोजन केले जात होते. त्यात भाग्यवान गुंतवणूकदार महिलांना ३६ हजार रुपये दिले जाऊन पुढील मुदतीपर्यंत कोणतीही रक्कम जमा करणे बंधनकारक करण्यात येत नव्हते. हजारो महिलांनी पुनमियाने सुरू केलेल्या योजनेत गुंतवणूक केली होती. परंतु, ज्या महिलांना पुनमियाने चेक दिले, ते बाऊन्स झाले तर काही भाग्यवान तसेच मुदत संपलेल्या सदस्यांना ठरलेल्या रकमा देण्यात आल्या नाहीत. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक महिलांनी मंगळवारी भार्इंदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पुनमियाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि अटक केली. (प्रतिनिधी)
भाजपाच्या पदाधिकारी करिष्मा पुनमियांना अटक
By admin | Updated: February 12, 2015 05:47 IST