शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

केळकर समितीचा अहवाल गुंडाळला? चौकशीसाठी मनिष जोशींची नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:20 IST

पार्किंग प्लाझात अभिनेत्रीला लस दिल्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या समितीचा अहवाल महापालिकेने गुंडाळला असल्याचे समजते.

कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न : निरंजन डावखरे

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे: पार्किंग प्लाझात अभिनेत्रीला लस दिल्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या समितीचा अहवाल महापालिकेने गुंडाळला असल्याचे समजते. या प्रकरणात चौकशी पूर्ण झाली असतानाच, आता उपायुक्त मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एका चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराला भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आक्षेप घेतला असून, महापालिकेकडून सरळसरळ कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. दोषी कंत्राटदाराला वाचविण्यासाठी कोणाच्या इशाऱ्यावरून महापालिका यंत्रणा हलत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमध्ये पात्र नसतानाही अभिनेत्री मीरा चोप्रा हिला लस दिल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी डावखरे यांनी चौकशीची मागणी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी चौकशी करण्यासाठी उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने केलेल्या चौकशीत लस देण्यासाठी कंत्राटदार मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि.ने तब्बल २१ बनावट ओळखपत्रे तयार केली असल्याचे आढळले. त्यात एका अभिनेत्रीलाही अॅडमीन विभागात कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले होते. बेकायदा लसीकरणाची चौकशी केली जात असतानाच, संबंधित कंत्राटदाराने बनावट ओळखपत्रांचा वापर करून महापालिकेची फसवणूक करण्याबरोबरच आर्थिक लूटही केली असल्याचे निष्पन्न झाले होते. इतकेच नव्हे तर केळकर समितीपुढे कंत्राटदार वा कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने चौकशीसाठीही हजेरीही लावली नव्हती. या प्रकरणी केळकर समितीने संबंधित कंत्राटदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली असल्याची चर्चा होती. मात्र, महापालिका प्रशासनाने संबंधित अहवाल जाहीर न करता सोयिस्कर मौन बाळगले होते, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले होते. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना कारवाई करण्यास अडचण काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

विश्वनाथ केळकर यांच्या समितीने दिलेला अहवाल आता महापालिका प्रशासनाकडून गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केळकर समितीच्या अहवालाऐवजी आता महापालिकेने उपायुक्त मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. या समितीकडून आता लसीकरणातील गैरप्रकारांबाबत अहवाल घेतला जाणार आहे. या प्रकाराला आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आक्षेप घेतला आहे. केळकर समितीचा अहवाल जाहीर न करताच का फेटाळण्यात आला? केळकर समितीने कोणत्या शिफारशी केल्या? संबंधित अहवाल चुकीचा असल्याची प्रशासनाचे म्हणणे आहे का? कंत्राटदार मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीला पाठिशी का घातले जात आहे? नव्या मनिष जोशी समितीची आवश्यकता का भासली? असे सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केले असून, केळकर समितीच्या अहवालाचीच अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

ओम साई कंपनीचा कंत्राटदार कोणाचा जावई आहे का? 

ग्लोबल कोविड व पार्किंग प्लाझा हॉस्पिटलचे व्यवस्थापन करणाऱ्या मे. ओम साई आरोग्य केअर कंपनीकडून अनेक गैरप्रकार करण्यात आले आहेत. कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत सेवा असताना तब्बल दीड लाख रुपये उकळून व्हेंटिलेटर बेडवर रुग्णाला दाखल करणे, आणखी एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून बेडसाठी एक लाख रुपये घेणे, पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमधील १६ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी, नर्सचे पगार न देणे आदी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, या प्रकरणाच्या चौकशी करण्यात सत्ताधारी व महापालिका प्रशासन मूग गिळून आहे. इतकेच नव्हे तर केळकर समितीपुढे चौकशीसाठी हजेरी लावण्यासाठी कंत्राटदार फिरकला नाही. हा कंत्राटदार कोणाच्या जीवावर एवढी मुजोरी दाखवित आहे. तो कोणाचा जावई आहे? असा सवाल आमदार डावखरे यांनी केला आहे. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाNiranjan Davkhareनिरंजन डावखरेCorona vaccineकोरोनाची लस