कऱ्हाड : ‘जातीयवादी पक्षांचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव आहे. हाच पक्ष सर्वत्र भ्रष्टाचाराची विधाने करत फिरत आहे. परंतु त्यांच्याकडे जमलेली मंडळी दर्जाहीन व भ्रष्टाचारी असल्याचा विसर त्यांना पडला आहे. सांगलीतील राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट नेते भाजपाकडे आहेत,’ अशी टीका माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. शेरे व शेणोली विभागाने यशवंतराव मोहिते यांच्या विचारांची पाठराखण केली आहे. ती यावेळेलाही कायम ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ शेरे स्टेशन येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कामगार नेते आमदार भाई जगताप, आनंदराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, सदस्या अनिता निकम, शंकरराव निकम, प्रकाश पाटील, बाबूराव निकम, सरपंच मोहनराव निकम, मारुती निकम, उत्तमराव मोहिते, ‘कृष्णे’चे माजी संचालक माणिकराव जाधव, अशोकराव पाटील, हणमंतराव पाटील, किसनराव पाटील-घोणशीकर आदींची उपस्थिती होती. पतंगराव कदम म्हणाले, ‘या विभागात अनिष्ठ प्रथा निवडणुकीत होतील, अशा शंका आहेत. परंतु, येथील लोक शहाणे आहेत. वातावरण त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने तयार केले आहे. भाजपवाले मोदींना गल्लीबोळात फिरवू लागले आहेत. यातून भाजपने पंतप्रधानपदाचा लौकिक संपवल्याचे दिसते. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागेल एवढा निधी गावागावांत दिला आहे. त्यामुळे त्याची जाणीव मतदार ठेवतील.’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘नरेंद्र मोदींनी पक्षातील ज्येष्ठांना संपवले आहे. आपला फोटो हीच पार्टी समजून ते भाजपऐवजी ‘मोदी पार्टी’ म्हणून फिरत आहेत. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा वाईट प्रकरणांमध्ये सहभाग आहे. हा पक्ष हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे काहीही देणे-घेणे नाही. चीनच्या सीमेवर अद्यापही तणाव आहे. पण, त्या देशाच्या पंतप्रधानांना मोदी झोक्यावर झुलवतात, तर देशाचे संरक्षणमंत्री तात्पुरते आहेत. ते कायम आजारीच आहेत. त्यामुळे देश असुरक्षित आहे. शेरे व शेणोली परिसराला वैचारिक वारसा आहे. यशवंतराव मोहिते यांनी अनेक वर्षे या विभागातून नेतृत्व केले. तोच वारसा या विभागातील जनता जपेल. काँग्रेसने चुकीचे काही केले नाही; मात्र मित्रपक्षाने जे काही केले. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आम्हाला त्रास होत आहे.’ (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे पाटील-शेरेकर व्यासपीठावरदुशेरेचे दिवंगत स्वातंत्र्यसैनिक दादा मास्तर यांचे चिरंजीव व यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका विजया पाटील यांचे दीर डॉ. जयवंत पाटील व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कॉम्र्रेड अधिकराव पाटील-शेरेकर यांनी व्यासपीठावर येऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात सहभाग घेतला, त्याची सर्वत्र चर्चा आहे़झंझावाती दौऱ्याला उत्स्फू र्त प्रतिसादमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ आज (सोमवारी) कार्वे, कोडोली, दुशेरे, शेरे, शेणोली परिसरात झंझावाती दौरा केला. उघड्या जीपमधून प्रत्येकाला हात उंचावून स्मित हास्य करणाऱ्या बाबांच्या दौऱ्याला अबालवृद्ध व महिलांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करून प्रतिसाद दिला. यावेळी अनेक गावात रांगोळ्या रेखाटून स्वागत करण्यात आले.
पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांचा भाजपाला विसर
By admin | Updated: October 6, 2014 22:31 IST