सोलापूर : थकलेली ऊसबिले व्याजासह अदा करण्याचे आदेश कारखान्यांना द्यावेत, या मागणीचे निवेदन देण्यास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा बेदम लाठीमार झेलावा लागला. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होत असताना सहकारमंत्री उघड्या डोळ्याने बघत राहिले, असा आरोप करीत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी मंत्री पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर हे तर शेतकऱ्यांचे वैरी आहेत, अशी संतप्त टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. एफआरपीच्या (किफायतशीर व वाजवी दर) वादात कारखान्यांनी दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊसबिले चुकती केलेली नाहीत. ही देणी कारखान्यांनी व्याजासह शेतकऱ्यांना अदा केली पाहिजेत, ही संघटनेची मुख्य मागणी आहे. सोलापुरात सोमवारी दुपारी भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. तो आटोपून निघालेल्या सहकारमंत्री पाटील यांचा ताफा भैया देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडविला. गाड्या थांबल्याबरोबर व्याजासह ऊसबिलाचे वाटप करण्याच्या कारखान्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी पाटील यांच्याकडे केल्यावर, केंद्र सरकारकडून मदत मिळाल्याने बिले वाटपाची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर देशमुख यांनी बार्शी येथील साखर कारखान्याशी संबंधित बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा ‘ते काम माझे नाही, गाड्या पुढे जाऊ द्या’, अशी पाटील यांनी सूचना केली. तेव्हा पाटील यांच्या गाडीपुढे घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी ठिय्या दिला आणि प्रचंड संख्येत असलेले पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. बंदोबस्तावरील पोलीस निरीक्षक ओमासे व कमांडो पथकाने कार्यकर्त्यांवर बेदम लाठीमार सुरू केला. यामुळे पळापळ सुरू झाली. चपला तेथेच टाकून मिळेल त्या रस्त्याने कार्यकर्ते पळू लागले़ यातून सहकार मंत्र्यांची गाडी व पोलिसांचा ताफा मार्गस्थ झाला. त्यानंतर पोलिसांच्या कृतीचा निषेध व्यक्त करणाऱ्या भैया देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून व्हॅनमध्ये घातले. तेव्हाही कार्यकर्ते व पोलिसांत झटापट झाली. यावेळीबार्शीहून आलेले भाजपाचे कार्यकर्ते छोटूभाई लोहे यांनीही या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)एफआरपी मागणाऱ्या शेतकऱ्यांना काठ्या मारणारे हे सरकार बिल्डरांसाठी पायघड्या घालण्याचे काम करते. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दोन मिनिटांचाही वेळ नसणारे हे सरकार गुन्हेगाराप्रमाणे शेतकऱ्यांना दंडूके घालत आहे. हे तर शेतकऱ्यांचे वैरी आहेत़ दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करत नाही, पीक कर्ज देत नाही, भाव देत नाही़ त्यांच्या हक्काचा विमा मंजूर होऊनही तो मिळत नाही. या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?- धनंजय मुंडे , विरोधी पक्षनेते, विधान परिषदन्याय्य मागण्यांसाठी शेतकरी सहकारमंत्र्यांच्या गाडीसमोर बसले. त्यांच्यावर सराईत गुन्हेगार किंवा हिंसक जमावाप्रमाणे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती. शेतकऱ्यांपेक्षा पोलिसांची संख्या तिपटीने होती. इतर मार्गानेही कार्यकर्त्यांना हटविता आले असते. पण पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. सहकारमंत्री शेतकऱ्यांना सामोरे आले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. लाठीमारचा आदेश मी दिलेला नाही. उलट मी देशमुख यांचे निवेदन स्वीकारले आहे. ऊसबिलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मी त्यांना सांगितले आहे. - चंद्रकांत पाटील, सहकार व बांधकाममंत्रीबार्शीच्या कुमदा साखर कारखान्याने शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. त्यावर कसलीच कारवाई केली नाही. सरकार आणि कारखानदार एकच आहेत याचा आज प्रत्यय आला. - भैया देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना
शेतकऱ्यांना बेदम चोप!
By admin | Updated: June 30, 2015 03:46 IST