- साहेबराव नरसाळे
अहमदनगर, दि. ४ : लग्नानंतर सात वर्षे अपत्यप्राप्ती नसलेल्या एका महिलेच्या पोटी तिळ्या मुलांचा जन्म झाला असून, विशेष म्हणजे तीनही मुलांची प्रकृती सुदृढ आहे़ अपत्य होत नसल्यामुळे लग्नानंतर सातत्याने सात वर्ष उपचार घेणाऱ्या नगरमधील एका महिलेला तिळी अपत्यप्राप्ती झाली आहे़ यातील पहिला मुलगा १७०० ग्रॅमचा तर दुसरा व तिसरा मुलगा १८०० ग्रॅम वजनाचा आहे़ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तीनही मुलांची प्रकृती चांगली आहे़ सध्या या महिलेचे वय तीस आहे़.
गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यात (३४ आठवडे) या महिलेची प्रसुती झाली़ सोनाग्राफीमध्ये तीन मुले असल्याचे निष्पन्न झाले होते़ डॉक्टर बन्सी शिंदे व डॉ़ स्मिता शिंदे यांनी यातील एक मुल कमी (एमब्रीयो रिडक्शन) करण्याचा सल्ला संबंधित दाम्पत्याला दिला होता़ मात्र, मातेने सर्व गर्भ ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार डॉक्टरांनी उपचार सुरु केले़ मंगळवारी शिंदे हॉस्पिटलमध्ये या महिलेची प्रसुती झाली असून, तीन मुले जन्मास आली आहे़ आई व मुलांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़