संतोष वानखडे / वाशिम : रासायनिक किटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी राज्यातील शेतकरी हळूहळू जैविक किटकनाशकांच्या वापराकडे वळला असल्याची साक्ष कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. २0१३- १४ या वर्षात राज्यात १ हजार ४३३ मेट्रीक टन जैविक किटकनाशकांचा वापर झाला होता. २0१४-१५ मध्ये हाच आकडा ३ हजार ९७५ मेट्रीक टनावर पोहोचला. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल होत आहेत. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगांना पिकांवरील विविध प्रकारची रोगराई काही प्रमाणात अडथळा निर्माण करीत असते. यावरही काळानुसार उपाययोजना शोधून काढण्यात आल्या. रोगराई व किडींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक व जैविक किटकनाशकांचा वापर केला जातो. जैविक किटकनाशकांऐवजी रासायनिक किटकनाशकांचे परिणाम तत्काळ दिसत असल्याने शेतकरी रासायनिक खतांकडे मोठय़ा संख्येने वळले. यातूनच रासायनिक किटकनाशकांचा अतिरेक होत गेला. कीटकनाशकांचा ज्यादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. विविध प्रकारचा भाजीपाला व फळांवर अतिरिक्त रासायनिक किटकनाशकांचा अंश काही प्रमाणात राहत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला. याशिवाय हा प्रकार जमिनीचा पोतही काही प्रमाणात बिघडवू शकतो. हे टाळण्यासाठी रासायनिक किटकनाशकांचा योग्य वापर करणे किंवा जैविक किटकनाशकाचा वापर वाढविणे, याबाबत कृषी विभाग शेतकर्यांमध्ये जनजागृती करीत आहे. परिणामी, शेतकरी हळुहळु जैविक किटकनाशकांकडे वळत असल्याचे राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
जैविक किटकनाशकाला शेतक-यांची पसंती!
By admin | Updated: June 24, 2015 01:31 IST