- राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावाच्या स्थितीमुळे देशातील आयुध निर्माणीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अनियमित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याची पुष्टी भद्रावती आयुध निर्माणीतील एका वरिष्ठ अधिकारी सूत्राने ‘लोकमत’कडे केली केली.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. तणावाची स्थिती आणि संबंधित घडामोडी बघता भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देशातील आयुध निर्माणीलाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यापासून या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून अनिश्चित काळासाठी असल्याची माहिती भद्रावती आयुध निर्माणीतील अधिकारी सूत्राने ‘लोकमत’ला दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या दाैऱ्यात होती हल्ल्याची शक्यतापंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वेचे उद्घाटन करणार होते. परंतु त्या दिवशी कटरा येथे वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने मोदी यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी अशा हल्ल्याचा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला होता.
कटरा ते श्रीनगर रेल्वेमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्याचा भाग देशाच्या अन्य राज्यांशी अधिक उत्तमप्रकारे जोडला जाणार आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यताही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीइस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती तेथील लष्करी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर सुमारे ४५० किमी अंतरापर्यंत मारा करू शकते.