जळगाव : कोणत्याही क्षेत्रात मोठे पद मिळाले तरी माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजे. गर्वाची भाषा केली की माणसाचे नुकसान होत असते. काही वर्षांपूर्वी मोठ्या तोऱ्यात फिरणारे मंत्री आज ‘सांभाळून घ्या’अशा विनवण्या करत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न घेता लगावला.दोडे गुर्जर संस्थानतर्फे रविवारी गुणवंताचा सत्कार झाला. महाजन म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे ‘ना खाऊंगा, न खाने दुंगा’ हे धोरण आहे. त्यामुळे पंधरा वर्षे मंत्रिपद भोगणारे आज त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या घोटाळ्यांचे भोग भोगत आहे.मोठ्या पदावर माणूस कधीही समाजामुुळे पोहोचत नाही, तर स्व:कर्तृत्वानेच माणूस मोठा होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनतीला महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. फडणवीस हे केंद्रात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाजन हे मुख्यमंत्री तर मी गृहमंत्री, अशी संधी आहे. त्यासाठी महाजन यांनी मला भाजपात येण्याची आॅफर दिल्याचे पाटील यांनी सांगितले.माझा मंत्रिमंडळ प्रवेश म्हणजे प्रसूतीच्या वेदनेसारखा - खडसेमाझ्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत अनेकांकडून विचारणा होते, मात्र हा प्रश्न गहन आहे. एकीकडे गर्भवती महिलेला होणाऱ्या प्रसूती वेदना तर दुसरीकडे बाळाची प्रतीक्षा करीत असलेले नातेवाईक, अशीच अवस्था आपली व कार्यकर्त्यांची झाली आहे, अशी भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.जळगाव महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्या अमृत महोत्सवी सोहळ््यात खडसे म्हणाले, खडके हे माझ्याकडे आले व म्हणाले, ‘नाथाभाऊ आपले काही होईल की नाही?’ त्यावर मी त्यांना म्हणालो तुमचा प्रश्न गहन आहे.एखाद्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलेले असते व बाहेर नातेवाईक डॉक्टरांना विचारतात, ‘कुछ हुआ क्या?’ मुलगा झाला की मुलगी झाली, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. खडसेंच्या या विधानावर सभागृहात हंशा पिकला.
मोठ्या तोऱ्यात फिरणारे मंत्री आज ‘सांभाळून घ्या’ म्हणतात!, खडसे यांना अप्रत्यक्ष टोला; गिरीश महाजन यांची फटकेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:41 IST