ST Bus News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेकडे संवेदनशीलतेने पाहत त्यांना व त्यांच्या पत्नीच्या मोफत प्रवास सवलतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
परिवहन मंत्री तथा अध्यक्ष रा.प. महामंडळ प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पात्र कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मोफत प्रवास पास व्यवस्थेला अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार
या निर्णयानुसार, सेवेतून निवृत्त झालेले तसेच अपघातग्रस्त किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी/पतींनाही माहे- एप्रिल २०२६ पासून पूर्ण वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेताना, प्रवासासाठी केवळ नाममात्र फरकाची रक्कम भरून एसटीच्या विविध प्रकारच्या बससेवांमधून प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे, कुटुंबीय प्रवासाच्या संदर्भात काही अटी व निकष निश्चित करून सवलतीचा लाभ अधिक स्पष्ट करण्यात आला आहे.
डिजिटल ओळख व व्यवहार प्रक्रिया अधिक सुलभ होणार
यासोबतच, प्रवास सवलतीच्या पारंपरिक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देत 'RuPay On-The-Go' सक्षम NCMC कार्ड प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मोफत प्रवास पासधारकांसाठी डिजिटल ओळख व व्यवहार प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. राज्यभरातील आगारांमध्ये अधिकृत एजंटमार्फत या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, NSDL पेमेंट बँकेच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
NCMC कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव
महत्त्वाचे म्हणजे, आगामी काळात या सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून डिजिटल प्रणालीचा स्वीकार करणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे सामाजिक बांधिलकी जपत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे डिजिटल व्यवहार प्रणालीचा प्रसार-या दुहेरी उद्दिष्टांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येतो. परिणामी, एसटी महामंडळाची सेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या हिताचे भान राखणारी आणि काळाच्या गरजेनुसार बदल स्वीकारणारी संस्था म्हणून अधिक सक्षम होत असल्याचे या निर्णयातून अधोरेखित होते.
Web Summary : ST Corporation provides free travel passes with digital NCMC for retired employees and their spouses. This initiative ensures convenient, transparent, tech-driven access to transportation, enhancing their post-retirement life with year-long benefits.
Web Summary : एसटी निगम ने सेवानिवृत्त कर्मचारियों और उनके जीवनसाथियों के लिए डिजिटल एनसीएमसी के साथ मुफ्त यात्रा पास प्रदान किए। यह पहल परिवहन तक सुविधाजनक, पारदर्शी, तकनीक-संचालित पहुंच सुनिश्चित करती है, जिससे उनके सेवानिवृत्ति के बाद के जीवन को साल भर के लाभों से बढ़ाया जा सके।