अहमदनगर : शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर भूमाता ब्रिगेडच्या महिला चढल्यास, देवस्थानच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे गुरुवारी ब्रिगेडच्या महिलांच्या प्रवेशाला प्रतिबंध घालण्याचे आदेश पुण्याचे धर्मादाय सहआयुक्त शि. ग. डिगे यांनी काढले आहेत.भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी चर्चेस तयार असतील, तर त्यांचे म्हणणे ऐकून देवस्थानच्या विश्वस्तांनी त्यावर निर्णय घेण्याचे धर्मादाय सहआयुक्तांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये न्यासाच्या संपत्तीची हानी होत असल्यास, तेथे लोकांना प्रतिबंध करण्याचा अधिकार कार्यकारिणीस आहे. राज्यघटनेने लोकांना आंदोलनाचा अधिकार दिला असला, तरी ४०० महिलांनी एकाच वेळी चौथऱ्यावर घुसून दर्शन घेणे हा वैध मार्ग नाही. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत चौथऱ्यावर दर्शनास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारे जमाव जमवून मंदिराच्या आत प्रवेश करू नये, असे सहआयुक्त धर्मादाय यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
‘भूमाता ब्रिगेड’ला शनी मंदिरात प्रवेश बंद
By admin | Updated: January 24, 2016 02:37 IST