गुहागर : माजी कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या कार्य अहवालात प्रत्यक्षात न झालेल्या विकासकामांचा उल्लेख करून त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचे नमूद केले आहे. जाधव यांनी मतदारांची दिशाभूल व फसवणूक केली असल्याची तक्रार अंजनवेलचे सरपंच यशवंत बाईत यांनी जिल्हा निवडणूक विभागाकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत दोन्ही बाजूंचे जाबजबाब नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुहागरचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.२६ सप्टेंबरला तत्कालीन कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी कार्य अहवाल प्रसिद्ध केला. त्यात आपल्या गावात न झालेल्या विकासकामांचा उल्लेख करून त्यांनी मतदारांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बाईत यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे रजिस्टर एडीने पाठविली होती. त्यानुसार संबंधितांची चौकशी करावी, असे आदेश गुहागरच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राप्त झाले असून, त्यांनी तक्रारदार यशवंत बाईत यांचा जबाब नोंद करून घेतला आहे. (प्रतिनिधी)
भास्कर जाधव यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
By admin | Updated: October 10, 2014 23:01 IST