CM Devendra Fadnavis: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने मोठं वादंग निर्माण झालं आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा येणं गरजेचं नाही, असं ते म्हणाले. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळातील गटनेते भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच आहे, राज्यात येणाऱ्यांनी मराठी शिकलंच पाहिजे," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. मात्र त्याचवेळी फडणवीस यांनी भय्याजी जोशी यांच्यावर टीका करणं टाळलं.
"मी भय्याजी जोशी यांचं पूर्ण वक्तव्य ऐकलेलं नाही. त्यामुळे ते पूर्ण ऐकल्यावर मी त्यावर बोलेन. पण, सरकारची भूमिका आहे की, मुंबईची, महाराष्ट्राची आणि आपल्या शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे, माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भय्याजींचं देखील काही दुमत असेल असं मला वाटत नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंची भाजपवर टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेत्याने मराठी भाषेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. "कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भय्याजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.