मुंबई : मेट्रोच्या दरवाढीमुळे मुंबईकर वैतागले असतानाचा आता त्यांचा बेस्टचा प्रवासही महागणार आहे. आर्थिक संकटाचे खापर आतापर्यंत काँग्रेस सरकारवर फोडणा-या शिवसेना - भाजपा महायुतीने राज्यात सत्तेवर येताच कानावर हात ठेवले आहेत़ सत्तांतरानंतरही या सार्वजनिक उपक्रमाला नवीन सरकारने मदतीचा हात दिलेला नाही़ याउलट पालिकेच्या महासभेत फेबु्रवारी व एप्रिल महिन्यात करण्यात येणाऱ्या भाडेवाढीवर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे एकाच वर्षात मुंबईकरांना दोन रुपये भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे़ बेस्ट प्रशासनाने कर्जाचे डोंगर वर्षागणिक वाढतच राहिल्याने भाडेवाढ टाळण्यासाठी पालिकेकडून दीडशे कोटींचे आर्थिक साहाय्य मागितले होते़ त्यानुसार निवडणुकीच्या काळात गेल्यावर्षी पालिकेने दीडशे कोटींचे अनुदान बेस्टला मंजूर केले़ याचे दोन हप्ते मिळाल्यानंतरही बेस्टच्या आर्थिक परिस्थितीत बदल झालेला नाही़ राज्यात सत्तेतवर येताच भाजपानेही बेस्टला मदत करण्याची इच्छाशक्ती दाखविली होती़ त्याबाबत पक्षाच्या काही नेत्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी केली होती. प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारने मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली. स्थायी समितीपाठोपाठ पालिकेच्या महासभेत भाडेवाढीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केला़ याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी घोषणा करीत सभात्याग केला़ (प्रतिनिधी)
मेट्रोनंतर ‘बेस्ट’ही महाग
By admin | Updated: January 14, 2015 05:02 IST