बीड - २१ दिवस वाल्मिक कराडला मदत करणारे कोण आहेत, त्या सगळ्यांना सहआरोपी करा. एसआयटी नेमल्यानंतर कराडने सरेंडर केले असं सांगत खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, १२ डिसेंबरला वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर भेट झाली. खंडणीखोर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर तिथून निघून गेला. मग पोलिसांनी सोडले का? गुन्हा झालेल्या आरोपीला पोलीस संरक्षासाठी गार्ड होते. नागपूर, दिंडोरी, गोवा सगळीकडे फिरून ते पुण्याच्या घरी कुणाकडे राहिले? ११ डिसेंबर ते ३१ डिसेंबर वाल्मिक कराडला कुणी मदत केली. या सर्वांना सहआरोपी का केले जात नाही. या आरोपींनाही मकोका लावला पाहिजे. एसआयटीतील नावे फायनल केल्यानंतर आरोपी पोलिसांकडे सरेंडर झाला असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या झाली पण याची सुरुवात २८ मे २०२४ ला झाली. २८ मे रोजी केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. रमेश घुले आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा झाला. घुलेला अटक झाली पण अनोळखी कोण हे पोलिसांनी शोधले नाही. त्यावर पोलीस काही बोलत नाही. याचा अर्थ अनोळखीवर कुठलीही वाच्यता करायची नाही असं पोलिसांना सांगितले गेले. ही घटना ज्यादिवशी घडली त्यानंतर रमेश घुले नावाचा व्यक्ती कुठेही समोर आला नाही. पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्यामुळे तो कुठल्याही अवैध कामात पुढे आला नाही असं सोनवणे म्हणाले.
तसेच ६ डिसेंबरला आवाडा कंपनीच्या यार्डात काही हाणामारी झाली असं प्रथमदर्शनी दिसते परंतु याचीही सुरुवात २९ नोव्हेंबर २०२४ रोजी २ कोटींची खंडणी मागितली तेव्हा झाली. २९ च्या घटनेचा गुन्हा ११ डिसेंबरला नोंदवला गेला. खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार पूर्ण झाला नाही म्हणून ६ डिसेंबरला आवाडा कंपनी परिसरात गुंड पाठवून दहशत निर्माण करणे, अधिकाऱ्यांना मारणे हे काम ७ जणांनी केले. कंपनीने जी सुरक्षा व्यवस्थेचं काम दिले ते बीड बाहेरील व्यक्तींना दिले. कंपनीला सुरक्षा पुरवण्याचं काम कुणाला दिले, केजमध्ये कुणी माणूस नव्हते का मग हे कोण आहेत? हेदेखील तपासण्याची गरज आहे. सुरक्षा गार्डला, अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर ६ तारखेला ते पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपींना सोडून दिले. २८ मे २०२४, २९ नोव्हेंबर, त्यानंतर ६ डिसेंबरला या घटनेची सुरूवात झाली. या खंडणीखोरांनी कोणाकोणाला फोन केलेत. आता जो खंडणीचा गुन्हा झालेला अटकेत असलेला आरोपी आहे तो २९ तारखेला केजमध्ये होता. केजमध्ये एका प्लॉटची रजिस्ट्री करून घेतली. २९ नोव्हेंबरपासूनचे सीडीआर काढा अशी मागणी खासदारांनी केली.
दरम्यान, ६ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखचा जीव वाचला असता. या प्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी पाटील यांना सहआरोपी करा. ९ डिसेंबरला संतोषचं अपहरण केले त्यानंतर टॉर्चर करून क्रूर हत्या केली. ९ डिसेंबरनंतर मीडियाला ही बाब समजली. दुपारी साडे तीन वाजता संतोषचं अपहरण झाले. ४ वाजता धनंजय देशमुख पोलिसांकडे गेले, माझ्या भावाचं अपहरण झालेले आहे. विष्णु चाटेने ३० कॉल केले. साडे सहा वाजता संतोषचा मृतदेह सापडला. पोलिसांना हा मृतदेह सापडला. पोलीस यंत्रणेतला कोण यात सहभागी आहे? मृतदेह पोलीस वाहनात टाकला गेला ती गाडी फिरवून फिरवून केजच्या हॉस्पिटलला आणली. कळंबच्या दिशेने पोलीस वाहन का गेले हे महाराष्ट्रातील जनतेला कळालं पाहिजे. पोलीस यंत्रणेवर संशय घेणाऱ्या या गोष्टी आहेत असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.