मुंबई : जिल्हाधिकाऱ्यांना मी अलिकडेच जादा प्रशासकीय अधिकार दिले आहेत. आता अमुक खात्याचे अधिकारी ऐकत नाहीत, असे सांगू नका. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून सरकारचा पैसा लाटणाऱ्या टँकर लॉबीचा बीमोड करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील २१ जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानाहून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत ७० हजार अर्ज आले असून त्यांना प्राधान्याने तळे देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पीक विमा योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पाणी टंचाई आदींबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवारच्या कामाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून आवश्यक तिथे टँकरने पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे पण टँकर लॉबी करून पाण्याचा व्यापार केला जात असेल तर कठोर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)पाणी समस्येसाठी आता टोल फ्री क्रमांकपाण्याच्या संदर्भात येणाऱ्या कोणत्याही अडचणी कळविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टोल फ्री क्र मांक जनतेसाठी उपलब्ध करु न द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉटर वॉर रु म’ ची स्थापना करावी तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने आपआपल्या जिल्ह्याचा सिंचन आराखडा तयार करावा. या आर्थिक वर्षात इंदिरा, रमाई आणि शबरी आवास योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख घरांचे उद्दिष्ट आहे. ही घरकुलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली बांधली जावीत असे ते म्हणाले.
टँकर लॉबीचा बीमोड करा - मुख्यमंत्री
By admin | Updated: March 29, 2016 01:34 IST