राजेंद्र वाघ, शहाडशिक्षक दिनी राज्यातील आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित केले खरे. मात्र पुरस्कारात दिले जाणारे १ लाख रुपये सहा महिने होऊनदेखील आदर्श शिक्षकांना न मिळाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाची बनवाबनवी चव्हाट्यावर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिले. २०१३-१४ या वर्षासाठी ३७ प्राथमिक शिक्षक, ३८ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी भागात काम करणारे शिक्षक, २ कला व क्रीडा क्षेत्रातील शिक्षक, १ अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक तर १ स्काऊट व १ गाईड अशा ९८ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. मात्र ठाण्यातील ८ शिक्षकांना अद्याप पुरस्काराच्या १ लाख रुपये बक्षिसाचा लाभ मिळालेला नाही.पुरस्काराबाबत बनवाबनवी१९६२-६३पासून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढ, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ दिले जात होते. या वर्षीही पुरस्काराचे स्वरूप साधारण असेच होते. मात्र २००६मध्ये शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर वेतन आयोगात वेतनवाढीची तरतूद नसल्याचे कारण पुढे करीत या दोन जादा वेतनवाढी देणे बंद करण्यात आले. एवढेच नव्हेतर ज्या शिक्षकांना ही वेतनवाढ मिळाली होती ती थांबविण्यात आली. त्याऐवजी १० हजार ठोक रक्कम देण्यात येऊ लागली. २०१३मध्ये पुरस्कारात रोख रक्कम व लॅपटॉपही देण्यात आला. परंतु, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुन्हा दोन जादा वेतनवाढ मिळावी या शिक्षक संघटनांच्या मागणीची दखल घेत वेतनवाढीऐवजी १ लाख रुपये इतकी ठोक रक्कम देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.
शिक्षण विभागाची बनवाबनवी
By admin | Updated: February 2, 2015 04:49 IST