संजय खांडेकर / अकोलाकोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी धनिकांकडे वेळ नसल्याने त्यांनी या कामासाठी रोजंदार कामाला लावले आहेत. तीनशे रुपये रोज देऊन त्या व्यक्तीला दिवसभरात सोळा हजार रुपये बदलून आणण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे.चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये दररोज सर्वसामान्यांची झुंबड उडत आहे. तर दुसरीकडे बँकेत जाऊन पैसे जमा करण्यासाठी धनिकांकडे वेळच नाही. त्यामुळे त्यांनी दुकान तसेच घरातील नोकर-चाकरांना हे काम दिले आहे. बँकामधील गर्दी पाहता आता तर या धनिकांनी ‘रोजंदार’ कामाला लावले आहेत. हे रोजंदार सकाळीच नोटा घेऊन बँकेत आवश्यक त्या कागदपत्रांसह रांगेत उभे राहतात. दिवसभरात सोळा हजार रुपये ‘कॅश’ झाले की त्यांना तीनशे रुपये रोज देण्यात येतो.एका बँकेत नोटा बदलून झाल्यानंतर दुसऱ्या बँकेत नोटा बदलण्याच्या रांगेत ही व्यक्ती उभी राहते. काही बँक अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली असून अद्याप कारवाई मात्र झालेली नाही. गुरुवारपासून ते रविवारपर्यंत अनेकांनी या माध्यमातून नोटा बदलून घेतल्याचे खात्रीलायक माहिती आहे.
बँकेत पैसे भरण्यास लावले रोजंदार!
By admin | Updated: November 14, 2016 05:55 IST